Ticker

6/recent/ticker-posts

दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी; माया झोळसह तिघे न्यायालयीन कोठडीत



रामदास झोळ फरार; अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाकडून फेटाळला - एसआयटीकडून तपास सुरू

सोलापूर : मनोहर भोसले याच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दत्तकला शिक्षण संस्थेच्या कारभाराची धर्मादाय आयुक्त,शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीन यंत्रणांकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

या प्रकरणात माया झोळ यांना पोलिसांनी अटक केली असून रामदास झोळ अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान,रामदास झोळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.





या प्रकरणाच्या तपासादरम्यान राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


दरम्यान,अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह संबंधित कागदपत्रे,व्यवहारांचे स्वरूप आणि कथित आर्थिक संबंध याबाबत विविध यंत्रणांकडून स्वतंत्रपणे तपास केला जाणार असल्याने या प्रकरणाला आता अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

पोलिसांकडून फरार असलेल्या रामदास झोळ यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या अटकेनंतर तपासाला आणखी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धर्मादाय विभाग,शिक्षण विभाग आणि आयकर विभागाच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते,याकडे आता सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.