सोलापुरात पॉक्सो कायदा,अमली पदार्थ प्रतिबंध व रॅगिंगविषयक विधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात
सोलापूर : युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच बालकांचे संरक्षण,अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव आणि रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती आत्मसात करून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावावी,तसेच अमली पदार्थ आणि रॅगिंगपासून दूर राहावे,असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर यांच्या वतीने गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,सोलापूर येथे पॉक्सो कायदा, अमली पदार्थ प्रतिबंध आणि रॅगिंगविषयक कायदे या विषयांवर विधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पॉक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात पॉक्सो कायद्याविषयी सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष परमानंद जवळकोटे यांनी मार्गदर्शन केले. बालकांवरील लैंगिक अत्याचार व शोषण रोखण्यासाठी कायद्यात करण्यात आलेल्या विविध तरतुदी,बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक असून,बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची माहिती असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून युवकांनी दूर राहावे
अमली पदार्थ प्रतिबंध या विषयावर सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक,मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
युवक हे देशाचे भवितव्य असून त्यांनी व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षण,कौशल्य विकास आणि सकारात्मक सामाजिक उपक्रमांकडे वळावे. अमली पदार्थांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्र-मैत्रिणींनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.
रॅगिंग ही केवळ शिस्तभंगाची बाब नाही ‘रॅगिंग : सामाजिक व कायदेशीर समस्या’ या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
रॅगिंग ही केवळ शिस्तभंगापुरती मर्यादित बाब नसून,तिचे गंभीर सामाजिक तसेच कायदेशीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करावे,एकमेकांचा सन्मान राखावा आणि महाविद्यालयीन परिसरात सकारात्मक व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे,असे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील,गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गांधी,सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे,सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष परमानंद जवळकोटे तसेच रमेश रोडगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्रीधर पाटील, डॉ.द्वारकादास बाहेती, डॉ.गजेंद्र लाड,डॉ.वैशाली सरवदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्राचार्य डॉ.श्रीधर पाटील यांनी सांगितले.
आयोजनासाठी विशेष परिश्रम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी,महाविद्यालयाचे कर्मचारी आणि विधी
स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान,गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज,गांधी नाथा रंगजी फार्मसी कॉलेज आणि सारथी यूथ फाउंडेशन,सोलापूर यांचे सहकार्य लाभले.
कायदेविषयक ज्ञान, व्यसनमुक्तीची जाणीव आणि रॅगिंगविरोधी संवेदनशीलता या माध्यमातून युवकांना जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा विधी जनजागृती उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
