Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारितेपासून रुपेरी पडद्यापर्यंत… रोहन नंदाने यांचा प्रेरणादायी प्रवास


लेखणीने समाजाचे वास्तव मांडताना अभिनयातून विविध व्यक्तिरेखांना जीवंत करणाऱ्या रोहन नंदाने यांची दुहेरी यशस्वी वाटचाल

समाजातील घडामोडींवर अचूक शब्दांत प्रकाश टाकणारी लेखणी आणि कॅमेऱ्यासमोर विविध व्यक्तिरेखांना जिवंत करणारा अभिनय-या दोन्ही क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे रोहन नंदाने. पत्रकारितेच्या क्षेत्रात तब्बल ११ वर्षांचा सातत्यपूर्ण अनुभव घेत असताना त्यांनी अभिनयाची आवडही जपली आणि मेहनत, संयम व जिद्दीच्या जोरावर रुपेरी पडद्यावरही आपला ठसा उमटवला.
पत्रकार म्हणून काम करताना वार्तांकन,सामाजिक प्रश्नांचा अभ्यास आणि जनसंपर्काच्या माध्यमातून रोहन नंदाने यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली. समाजातील विविध स्तरांतील व्यक्ती,त्यांच्या समस्या आणि परिस्थिती जवळून समजून घेण्याची संधी पत्रकारितेमुळे मिळाली. याच अनुभवाचा प्रभाव त्यांच्या अभिनयावरही स्पष्टपणे दिसून येतो.



लेखणीसोबत अभिनयाची आवडही जपली - पत्रकारितेच्या व्यस्त कारकिर्दीतही त्यांनी अभिनयाची आवड कधीही कमी होऊ दिली नाही. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा अभ्यासपूर्वक स्वीकार करत त्यांनी पडद्यावर विविध व्यक्तिरेखा साकारल्या. पोलीस अधिकारी,एसीपी,पोलीस हवालदार,डॉक्टर,बँक अधिकारी,डॉगबॉय अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी वास्तववादी पद्धतीने साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली.

अभिनयातील प्रत्येक भूमिकेकडे ते केवळ काम म्हणून पाहत नाहीत,तर त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव,पार्श्वभूमी आणि मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या भूमिका अधिक प्रभावी आणि नैसर्गिक वाटतात.

ऐतिहासिक भूमिकेपासून हिंदी चित्रपटापर्यंत - रोहन नंदाने यांच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी संबंधित काळ, व्यक्तिरेखा आणि प्रसंगाचा सखोल अभ्यास करून भूमिका प्रभावीपणे साकारली.

अभिनेता विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘छावा’ या ऐतिहासिक हिंदी चित्रपटात काम करण्याची संधीही त्यांच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित या भव्य चित्रपटाचा भाग होणे हा त्यांच्या अभिनय प्रवासातील अभिमानाचा क्षण ठरला.

याशिवाय मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीतही त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘तुला शिकवीन चांगला धडा’, ‘आई कुठे काय करते’, ‘मुलगी झाली हो’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तसेच ‘येक नंबर’ आणि इतर चित्रपटांमधील कामामुळे त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

रश्मिका मंदानासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्याचा अनुभव
अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील विशेष बाब ठरली. ऐतिहासिक चित्रपटाचा भाग बनताना त्यांनी भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती प्रभावीपणे साकारली. अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्या अभिनय प्रवासाला नवी दिशा देणारा ठरला.

‘एसीपी पोलीस अधिकारी’ची भूमिका ठरली विशेष
आगामी ‘येक नंबर’ या चित्रपटात त्यांनी एसीपी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रत्यक्ष अनुभवामुळे पोलिसांच्या कामकाजाची, घटनास्थळावरील परिस्थितीची आणि समाजातील विविध घटकांची असलेली जाण या भूमिकेसाठी उपयोगी ठरली.


पत्रकार म्हणून प्रत्यक्ष घटनांचे वार्तांकन करताना आलेला अनुभव आणि अभिनयातील व्यावसायिक कौशल्य यांचा सुंदर संगम या भूमिकेत पाहायला मिळतो. त्यामुळे पत्रकारितेचा अनुभव अभिनयाला आणि अभिनयाचा अनुभव पत्रकारितेला समृद्ध करणारा ठरला आहे.




पुरस्कारांनीही कामाची दखल - पत्रकारिता आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘बेस्ट ॲक्टर अँड बेस्ट रिपोर्टर २०२४’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर पत्रकारितेतील योगदानाबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हे पुरस्कार केवळ त्यांच्या कामाची पावती नसून सातत्यपूर्ण मेहनत, गुणवत्तापूर्ण काम आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे केलेल्या वाटचालीचा गौरव मानला जातो.
पत्रकारिता समाज समजून घेण्याची दृष्टी देते, तर अभिनय व्यक्तिरेखा जगण्याची संधी

रोहन नंदाने यांच्या मते,पत्रकारिता आणि अभिनय हे दोन वेगळे प्रवाह असले तरी दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. पत्रकारिता त्यांना समाज समजून घेण्याची दृष्टी देते, तर अभिनय त्या समाजातील विविध व्यक्तिरेखा जगण्याची संधी देतो.

प्रत्येक भूमिका त्यांच्यासाठी नवा अनुभव असतो. प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळते. पत्रकारितेत वास्तव मांडताना मिळालेला अनुभव अभिनयात व्यक्तिरेखा अधिक वास्तववादी पद्धतीने साकारण्यासाठी उपयोगी पडतो.



संघर्षातून घडलेला प्रवास - रोहन नंदाने यांचा हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. शिक्षणासोबत काम,दिवसा नोकरी आणि महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. अनेक अडचणी,संघर्ष आणि जबाबदाऱ्या असूनही त्यांनी आपल्या स्वप्नांच्या आड परिस्थितीला येऊ दिले नाही.

दहावीनंतर शिक्षणासोबत काम करण्याची वेळ आली. मात्र संघर्षाला अडथळा न मानता त्यांनी त्यातूनच स्वतःला अधिक सक्षम बनवले. कामावरील निष्ठा,सातत्यपूर्ण मेहनत आणि शिकण्याची वृत्ती यांच्या बळावर त्यांनी पत्रकारिता आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले.
आई-वडिलांचे कष्ट आणि गुरूंचे मार्गदर्शन प्रेरणास्थान
आपल्या प्रत्येक यशामागे आई-वडिलांचे कष्ट,त्याग आणि विश्वास असल्याचे रोहन नंदाने सांगतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या स्वप्नांना पाठबळ दिले. 

कार्यालयातील सहकाऱ्यांचे सातत्यपूर्ण सहकार्य तसेच गुरूजनांचे मार्गदर्शन यांचेही ते मोल मानतात. त्यांच्या मते, आयुष्यातील प्रत्येक संघर्षाने त्यांना अधिक सक्षम केले. मिळणारी प्रत्येक संधी ही स्वतःला घडवण्याची संधी आहे आणि प्रत्येक अनुभव ही आयुष्यभराची सुंदर शिदोरी आहे.

दुहेरी कारकिर्दीचा आदर्श - आजच्या काळात पत्रकारिता आणि अभिनय या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत एकाच वेळी सातत्याने काम करत स्वतःची ओळख निर्माण करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. रोहन नंदाने यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडले, तर अभिनयाच्या माध्यमातून त्याच समाजातील विविध व्यक्तिरेखा पडद्यावर साकारल्या.

लेखणीतील वास्तव आणि पडद्यावरील अभिनय यांचा सुंदर संगम साधत रोहन नंदाने यांचा प्रवास सुरू आहे. संघर्षाला संधी, अनुभवाला ताकद आणि मेहनतीला यशाची जोड देणारा त्यांचा हा प्रवास नव्या पिढीतील पत्रकार आणि कलाकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतो.