Ticker

6/recent/ticker-posts

शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरण : ₹२१.५० लाखांच्या कथित गैरव्यवहारातील शिक्षकास सशर्त जामीन


सोलापूर : माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची शेअर मार्केटमध्ये अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ₹२१.५० लाखांची कथित आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षक राजकुमार विठ्ठल थिटे यांना जिल्हा व सत्र न्यायालय,सोलापूर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ८२४/२०२५ अंतर्गत राजकुमार विठ्ठल थिटे (रा. आगळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) व राजेश सुरजमल भंडारी (रा. भोसरी, जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६ व ४०९ (सद्यस्थितीत भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(२)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.





फिर्यादीनुसार,आरोपीने शेअर ट्रेडिंग व्यवसायाच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला नियमित परतावा देत विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी, त्यांच्या माजी सैनिक पती व इतर नातेवाईकांकडून एकूण ₹२१.५० लाखांची गुंतवणूक करून घेतली. काही काळानंतर परतावा व मूळ रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान,आरोपी राजकुमार थिटे यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या "अर्शद नियाज खान विरुद्ध झारखंड राज्य, २०२५" या निर्णयाचा आधार घेत,एकाच व्यवहारावर फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे एकत्र लागू होऊ शकत नसल्याचा युक्तिवाद केला. तसेच तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले असून आरोपी सात महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याने पुढील कोठडीची आवश्यकता नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.




सरकार पक्षाने जामिनास विरोध केला.मात्र,दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे यांनी १ जुलै २०२६ रोजी आरोपी राजकुमार विठ्ठल थिटे यांना सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अजय वाघमारे,ॲड.त्वरिता वाघ आणि ॲड.संकेत पवार यांनी काम पाहिले. फिर्यादी पक्षातर्फे ॲड.प्रशांत नवगिरे,तर सरकार पक्षातर्फे ॲड.दत्ता पवार यांनी बाजू मांडली.