मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण २,४३० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. या टप्प्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या २,४१२ दिवसांच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे.
या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. "हा केवळ विक्रम नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरव आहे," अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अनेक केंद्रीय नेते, मंत्रिमंडळातील सहकारी तसेच महायुतीतील नेत्यांनीही फडणवीस यांचे अभिनंदन केले.
१२ जुलै २०२६ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षे सात महिन्यांचा म्हणजेच २,४३० दिवसांचा एकूण कार्यकाळ पूर्ण केला. यामुळे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कार्यकाळ असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा सर्वाधिक कार्यकाळ
वसंतराव नाईक – ४,०९६ दिवस
विलासराव देशमुख – २,६८६ दिवस
देवेंद्र फडणवीस – २,४३० दिवस
शरद पवार – २,४१२ दिवस
आगामी काही महिन्यांत फडणवीस यांचा कार्यकाळ विलासराव देशमुख यांच्या २,६८६ दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
पहिला कार्यकाळ: ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ – १,८३९ दिवस
दुसरा कार्यकाळ: २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९ – ६ दिवस
तिसरा कार्यकाळ: ५ डिसेंबर २०२४ ते १२ जुलै २०२६ – ५८५ दिवस
एकूण २,४३० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या इतिहासात आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद केली आहे.
