Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी वारीत मध्य रेल्वेची दमदार सेवा; १०० विशेष गाड्यांतून १.१३ लाख भाविकांची वाहतूक


पंढरपूरमध्ये २४ ते २६ जुलैदरम्यान विशेष नियोजन; रेल्वेला १.२७ कोटी रुपयांचा महसूल

पंढरपूर : आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने व्यापक नियोजन करत सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली. २४ ते २६ जुलै या तीन प्रमुख दिवसांत पंढरपूरहून ये-जा करणाऱ्या १०० विशेष आणि नियमित गाड्या चालवण्यात आल्या. या माध्यमातून तब्बल १,१३,१९७ प्रवाशांनी रेल्वे सेवेचा लाभ घेतला.

मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार,यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गाड्यांची संख्या तसेच प्रवासी संख्या वाढली. मागील वर्षी तीन प्रमुख दिवसांत ९१ गाड्या चालवण्यात आल्या होत्या आणि १,१०,०६६ प्रवाशांची नोंद झाली होती. यंदा प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.



तीन दिवसांत १०० गाड्यांचे नियोजन - वारीच्या गर्दीचा विचार करून २४ जुलै रोजी ३५ गाड्या, २५ जुलै रोजी ३४ गाड्या, तर २६ जुलै रोजी ३१ गाड्या चालवण्यात आल्या. काही मार्गांवर गाड्या सुमारे ४० मिनिटांच्या अंतराने चालवून गर्दीचे नियोजन करण्यात आले.

रेल्वेच्या महसुलातही वाढ - या तीन दिवसांत मध्य रेल्वेला १.२७ कोटी रुपयांचा मूळ प्रवासी महसूल मिळाला. मागील वर्षी हा महसूल १.०७ कोटी रुपये होता. यंदा प्रवासी महसुलात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली असून, यामध्ये यूटीएस आणि पीआरएस प्रवाशांचा समावेश आहे.

तिकीट व्यवस्थेसाठी अतिरिक्त सुविधा - भाविकांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत यासाठी पंढरपूर स्थानकावर ५ अतिरिक्त आरक्षण केंद्रे सुरू करण्यात आली. त्यासोबतच ५ स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे आणि १० मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणालीची उपकरणे तैनात करण्यात आली. प्रवाशांना मोबाइल तिकीटासाठी ‘रेलवन’ ॲपचा वापर करण्यासही प्रोत्साहन देण्यात आले.



स्थानक परिसर आणि होल्डिंग एरियामध्ये मजबूत बॅरिकेडिंग करून शिस्तबद्ध रांग व्यवस्थापन करण्यात आले. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची नियंत्रित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील पादचारी पूल क्षेत्रातही विशेष व्यवस्था करण्यात आली.

१२,३३० चौ.मी.चे होल्डिंग क्षेत्र - भाविकांना गर्दीत थांबण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी जुन्या व नवीन स्थानक इमारतींमध्ये मिळून १२,३३० चौ.मी.क्षेत्रफळाचे कायमस्वरूपी होल्डिंग क्षेत्र उपलब्ध करण्यात आले. याशिवाय यंदा आणखी १,३२० चौ.मी.अतिरिक्त होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले. विद्यमान गुड्स शेडवर ३,००० चौ.मी.चे आच्छादित क्षेत्रही तयार करण्यात आले.

१८८ शौचालयांची सुविधा - स्वच्छतेच्या दृष्टीने स्थानकावर उपलब्ध असलेल्या ८४ शौचालयांव्यतिरिक्त १०४ तात्पुरती शौचालये उभारण्यात आली. त्यामुळे एकूण शौचालयांची संख्या १८८ झाली. गर्दीच्या काळात २४ तास स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि गटार व्यवस्थापनासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये कंत्राटी स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले.

१,२१९ भाविकांवर वैद्यकीय उपचार - आरोग्य सुविधांसाठी स्थानकातील आरोग्य युनिट तसेच विविध ठिकाणी वैद्यकीय बूथ उपलब्ध करून देण्यात आले. त्यांना २४ तास रुग्णवाहिका सेवा जोडण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी,नर्स,फार्मासिस्ट,ड्रेसर आणि रुग्णालय सहाय्यक यांच्या पथकाने वारीदरम्यान तब्बल १,२१९ भाविकांवर उपचार केले.

८० सीसीटीव्हींच्या माध्यमातून सुरक्षेवर नजर - पंढरपूर रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेसाठी ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह आधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यरत करण्यात आले. पाच व्हिडिओ वॉल,ट्रेन इंडिकेशन बोर्ड आणि मराठी,हिंदी,इंग्रजी व कन्नड अशा चार भाषांमधील उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यात आली.



गाड्यांमध्ये सुरक्षित चढणे-उतरणे सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचारी,आरपीएफ आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी गाडी सुटण्यापूर्वी दरवाजे बंद असल्याची तपासणी केली.

४ स्क्रॅच रेक्सची तयारी - विशेष गाड्यांसाठी रोलिंग स्टॉक तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी ४ स्क्रॅच रेक्स ‘गॅरंटीड ऑपरेशन’ अंतर्गत तयार ठेवण्यात आले होते. त्यामुळे विशेष गाड्यांचे सुरक्षित,विश्वासार्ह आणि वेळेवर परिचालन करण्यास मदत झाली.

१ लाख भाविकांना मोफत भोजन - वारीदरम्यान विविध स्वयंसेवी संस्था आणि धर्मादाय संस्थांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्थांनी मिळून जवळपास १ लाख यात्रेकरूंना मोफत भोजनाचे वाटप केले.

कर्मचाऱ्यांसाठीही विशेष व्यवस्था - वारीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या सुमारे ११० व्यावसायिक कर्मचारी, १५० आरपीएफ जवान, १३० जीआरपी कर्मचारी, ४० नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि ५० इतर विभागीय कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली.

वारकऱ्यांच्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार - आषाढी वारी २०२६ सुरक्षित आणि संस्मरणीय करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे तसेच स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवकांचे मध्य रेल्वेने आभार मानले आहेत. भक्तिभावाने पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.