मिरवणूक,वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिस प्रशासनाच्या सूचना; नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती २०२६ निमित्त सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस अधिकारी,शांतता समितीचे सदस्य,सोलापूर महानगरपालिका,धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुका,सार्वजनिक कार्यक्रम,वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजविण्याबाबतच्या सूचना,ध्वनीप्रदूषणाचे नियम, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी संबंधितांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवावा,अशा सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीच्या मार्गावर संवेदनशील ठिकाणी पुरेसा वेळ देऊन नियोजन करावे,असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सोशल मीडियावरही पोलिसांची नजर - अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया, पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि ऑनलाइन प्रचाराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे अफवा किंवा तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑनलाइन तसेच ऑफलाइन कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानगी घेणे आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणे,अनुचित प्रकार करणे किंवा शांतता भंग होईल असे कृत्य करणे टाळावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला.
शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित नागरिकांचे स्वागत करून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. उत्सव साजरा करताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही,याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत,उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरी करावी,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
बैठकीस पोलीस अधिकारी,महानगरपालिका अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी,अग्निशमन दलाचे अधिकारी,शांतता समितीचे सदस्य तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर शांतता समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
