Ticker

6/recent/ticker-posts

पाच रुपयांच्या पावती तिकिटांचा तुटवडा; सोलापुरातील नागरिक हैराण


सोलापूर : सोलापूर शहरात पाच रुपयांच्या न्यायालयीन (पावती) तिकिटांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विविध शासकीय कामांसाठी पाच रुपयांचे तिकीट आवश्यक असताना ते उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जास्त किंमतीची तिकिटे खरेदी करावी लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे.

याबाबत सोलापूरमधील विविध दुय्यम निबंधक कार्यालयांशी संपर्क साधला असता,तिकिटांचा पुरवठा कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. तसेच मुद्रांक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे समोर आले.


तिकिटांचा तुटवडा असल्याचा फायदा काही विक्रेते घेत असून,पाच रुपयांचे तिकीट उपलब्ध नसल्याने नागरिकांना गरजेपेक्षा अधिक रकमेची तिकिटे घ्यावी लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडासह वेळेचाही अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,संबंधित विभागाने पाच रुपयांच्या पावती तिकिटांचा तातडीने पुरवठा करून नागरिकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. तसेच तुटवड्याचे नेमके कारण आणि पुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी,अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.