सोलापूर : होटगी रोड परिसरातील भाग्यश्री पार्क येथून जाणारा नैसर्गिक नाला अखेर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून नाल्यावरील अतिक्रमणे हटविल्याने पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरळीत झाला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात पाणी साचणे,रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणे तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाची दखल घेण्यासाठी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सातत्याने सोलापूर महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता.
महानगरपालिका प्रशासनाने या मागणीची दखल घेत तातडीने कारवाई करत नाल्यावरील अतिक्रमणे हटविली. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा झाला असून भविष्यात पाणी साचण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी नागरिकांच्या हितासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे विशेष आभार मानले. प्रशासनाच्या तत्पर भूमिकेमुळे परिसरातील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान,स्थानिक नागरिकांनीही महानगरपालिका प्रशासन आणि विजयकुमार हत्तुरे यांच्या प्रयत्नांचे स्वागत करत भविष्यात नाल्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये,यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
