Ticker

6/recent/ticker-posts

संत माणकोजी महाराज यात्रेत भेसळखोरांवर प्रशासनाची करडी नजर; भाविकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही



सोलापूर : धामणगाव (ता. बार्शी)  "भाविक भक्तांच्या जीवाशी खेळ नको,भेसळयुक्त पेढा व रासायनिक केळ नको" असा स्पष्ट संदेश देत धामणगाव (ता.बार्शी) येथील संत माणकोजी महाराज यात्रेत भेसळयुक्त अन्नपदार्थ व दूषित खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

वैराग परिसरात भेसळयुक्त दूध व अन्नपदार्थांच्या रॅकेटविरोधात मोहीम सुरू झाल्यानंतर संत माणकोजी महाराज यात्रेकडेही प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या यात्रेस महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे.





आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या कालावधीत उपवासाचे पदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ तसेच आंबा,केळी,अननस आदी फळांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे हॉटेल, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि फळविक्रेत्यांनी भेसळमुक्त व स्वच्छ अन्नपदार्थांची विक्री करावी,अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेदरम्यान अवैध व्यवसाय, भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क राहणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची विविध ठिकाणी विशेष नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, "हरीत वारी" उपक्रमांतर्गत यात्रेकरूंच्या मार्गावर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांनी दिली.




धामणगावचे पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी गावातील तसेच बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांना शांतता, शिस्त आणि सहकार्याची भावना ठेवून यात्रोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेची पवित्रता आणि भाविकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.