सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कथित फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या ए.व्ही.चिंता यांना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश मनोज शिवप्रसाद शर्मा यांनी अटकपूर्व जामीन अर्ज क्र. ५६०/२०२६ वरील सुनावणीनंतर हा आदेश दिला.
काय आहे प्रकरण? - हे प्रकरण ३५० सीसी क्लासिक बुलेट मोटरसायकल (क्रमांक MH-02/ET-7958) खरेदी-विक्री व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार,जे पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत,यांनी २०२१ मध्ये झालेल्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत ए.व्ही.चिंता यांनी पैसे घेतल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र.६३०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद - आरोपीतर्फे ॲड.श्रीनिवास कटकुर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना हा वाद आर्थिक व दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगितले. तसेच २०२१ मधील व्यवहारावर तब्बल तीन वर्षांनंतर,म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याने तक्रार संशयास्पद असून ती वैयक्तिक द्वेषातून आणि त्रास देण्याच्या हेतूने करण्यात आल्याचा दावा केला.
न्यायालयाचे निरीक्षण - दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की,संबंधित व्यवहार २०२१ मधील असून मोटरसायकलचा ताबा सध्या दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. तसेच पैशांचे व्यवहार UPI द्वारे झाल्याने तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
जामीन मंजूर; अटीही घालण्यात आल्या न्यायालयाने ए. व्ही.चिंता यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेच्या जामीनदारावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे,तपासात पूर्ण सहकार्य करणे आणि पुरावे किंवा साक्षीदारांशी छेडछाड न करणे या अटी घालण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे ए.व्ही.चिंता यांना मोठा दिलासा मिळाला असून आरोपीतर्फे ॲड.श्रीनिवास कटकुर आणि ॲड. आकाश आयंची यांनी कामकाज पाहिले.
