सोलापूर : आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर आणि पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने "फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची भूमिका" या विषयावर कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालय,सोलापूर येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणे,फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची भूमिका स्पष्ट करणे, नागरिकांचे हक्क आणि न्यायप्रक्रियेतील विविध घटकांची जबाबदारी समजावून सांगणे तसेच कायद्याचे राज्य अधिक सक्षम करण्यासाठी जनसहभाग वाढविणे हा होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती अमोलकुमार देशपांडे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंह राजपूत यांनी फौजदारी न्यायप्रणालीतील पोलिसांची भूमिका,गुन्ह्यांचा तपास, पुरावे संकलन, न्यायालयीन प्रक्रियेमधील पोलिसांची जबाबदारी तसेच नागरिकांनी कायद्याचे पालन करून न्यायव्यवस्थेला सहकार्य करण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष) डॉ.अश्विनी पाटील,पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार,सहायक पोलीस आयुक्त (विभाग-२) विजयलक्ष्मी कुर्मी यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी,विधी क्षेत्रातील प्रतिनिधी,विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहर यांनी संयुक्तरीत्या विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केले, तर शेवटी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपोनि राजेश डाकेवाड यांनी केले. नियोजन दोघसिद्धी कक्ष,सोलापूर यांनी केले.
