48 हजार कोटींची कृषी वीज बिलमाफी; साडेसात HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य सरकारने साडेसात हॉर्सपॉवर (7.5 HP) पर्यंतच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अशा शेतकऱ्यांची तब्बल 48 हजार कोटी रुपयांची जुनी थकीत वीज बिले माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांवरील थकबाकीचे ओझे कमी होणार असून,नवीन वीज जोडणी मिळविण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत.
या निर्णयानुसार 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतचे कृषिपंप असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावरील सर्व जुनी थकीत वीज बिले पूर्णपणे माफ केली जाणार आहेत. अनेक शेतकरी थकबाकीमुळे नवीन वीज जोडणीपासून वंचित राहत होते. आता बिलमाफीमुळे त्यांना नवीन जोडणी घेणे सुलभ होणार आहे.
याशिवाय,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाअखेरीस दिवसा 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. या उपक्रमामुळे शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा अधिक सक्षम होईल आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत मिळेल.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला मोठा आधार मिळणार असून,शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा,सिंचनासाठी सुलभ वीजपुरवठा आणि नवीन वीज जोडणीचा मार्ग मोकळा होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
