सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल १४ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत ६ लाख ५५ हजार रुपये असून,या कारवाईमुळे १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोलापूर शहरात सातत्याने मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त एम.राजकुमार,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ.अश्विनी पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडेकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला.
दरम्यान, ५ जून २०२६ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना,१२ जुलै २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, चोरीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल घेऊन एक संशयित हैदराबाद रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने आपले नाव सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा.पडसाळी,ता. उत्तर सोलापूर) असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताने पोलिसी चौकशीत अखेर गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपीने सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १४ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईत सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटक राज्यातील १ अशा एकूण १४ गुन्ह्यांचा उलगडा झाला.
पोलीस तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीही सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आणि धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो सराईत वाहनचोर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ.अश्विनी पाटील,पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर,सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडेकर व त्यांच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
चौकट :
अटक आरोपी : सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर)
जप्त मोटारसायकली : १४
मुद्देमाल : ₹६,५५,०००
उघडकीस आलेले गुन्हे : १४
कारवाई करणारे पथक : सोलापूर शहर गुन्हे शाखा
