सोलापूर : अन्नत्याग उपोषणाच्या दहाव्या दिवशी आंदोलनकर्ते सुहास कदम यांनी अत्यंत गंभीर आरोप करत, "माझ्या मृत्यूस सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पुण्यातील एका नेत्याला जबाबदार धरले जाईल," असे म्हटले आहे.
सुहास कदम यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असा दावा केला आहे की, अवैध धंदे व कथित वसुली प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यांना न्याय मिळू नये म्हणून दबाव आणला जात आहे. तसेच त्यांनी असा आरोपही केला आहे की, पुण्यातील एका नेत्याकडून सोलापूर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला जात असून, त्या नेत्याचे नाव आपण उद्या जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कदम यांनी पुढे असा आरोप केला की,पोलीस आयुक्त त्यांच्या विरोधात चुकीची माहिती देत असून, स्वतःला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अधिकारी आणि कथित वसुलदार यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात असल्याचाही त्यांनी दावा केला आहे.
या संदर्भातील माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे सार्वजनिक केली असून, हे सर्व आरोप आंदोलनकर्ते सुहास कदम यांनी केलेले असून त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच सोलापूर पोलीस आयुक्त किंवा संबंधित व्यक्तींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
