Ticker

6/recent/ticker-posts

नागपुरातील हजरत सय्यद मुहम्मद बाबा ताजुद्दीन यांच्या 104 व्या वार्षिक उर्स सोहळ्यास 8 जुलैपासून प्रारंभ; 15 जुलैला मोठ्या कुल शरीफने सांगता


नागपूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद मुहम्मद बाबा ताजुद्दीन (र.अ.) यांच्या 104 व्या वार्षिक उर्स सोहळ्याचे आयोजन मुहर्रम 2026 निमित्त करण्यात आले आहे. नागपूर येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्ग्यात हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा,भक्ती आणि उत्साहात पार पडणार असून देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

उर्स सोहळ्याची सुरुवात 22 मुहर्रम,बुधवार 8 जुलै 2026 रोजी परचम कुशाई या धार्मिक विधीने होईल. त्यानंतर 25 मुहर्रम,शनिवार 11 जुलै रोजी भाविकांसाठी जन्नती दरवाजा खुला करण्यात येणार आहे.

26 मुहर्रम, रविवार 12 जुलै रोजी पारंपरिक शाही संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर 27 मुहर्रम, सोमवार 13 जुलै रोजी छोटा कुल शरीफ होईल. उर्स सोहळ्याची सांगता 29 मुहर्रम,बुधवार 15 जुलै 2026 रोजी मोठा कुल शरीफ कार्यक्रमाने होणार आहे.

या उर्स सोहळ्यात देशभरातून हजारो भाविक सहभागी होऊन बाबा ताजुद्दीन यांच्या दरग्यात चादर अर्पण,फातेहा, दुआ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून प्रशासनाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात येते.

उर्सच्या निमित्ताने आयोजकांनी सर्व धर्मीय भाविकांना शांतता,बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश देत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.