सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अभिनव प्रयोग; ड्रोन व AIच्या मदतीने गर्दीचे अत्याधुनिक मोजमाप
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची अचूक संख्या मोजण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यंदा अत्याधुनिक AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर शहरात दाखल झालेल्या सुमारे ३२ लाख १८ हजार १२९ वारकऱ्यांची अचूक नोंद करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. 'SentientLogics' या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने Cognitive Visual Human Neural AI तंत्रज्ञानाचा वापर गर्दीच्या मोजणीसाठी करण्यात आला.
तीन दिवसांत ३२ लाखांहून अधिक वारकऱ्यांची नोंद
उपलब्ध माहितीनुसार,
२४ जुलै २०२६ : ६,७५,२७४ वारकरी
२५ जुलै २०२६ : १८,१६,५७३ वारकरी
२६ जुलै २०२६ : ६,२६,२८२ वारकरी
अशा प्रकारे एकूण ३२,१८,१२९ वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केल्याचे AI आधारित मोजणीत स्पष्ट झाले. विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २५ जुलै रोजी तब्बल १८ लाख १६ हजार ५७३ वारकरी पंढरपुरात दाखल झाल्याचे समोर आले.
प्रवेशद्वारांवर AI कॅमेऱ्यांची नजर पंढरपूर शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर AI कॅमेरे बसविण्यात आले होते. यामध्ये सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक,तीन रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल,सावकर चौक व मिलिटरी हॉस्टेल तसेच सांगोला चौक एंट्री या मार्गांचा समावेश होता.
या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पंढरपुरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा,कपड्यांचा रंग,टोपी,पगडी आदी वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून प्रत्येक वारकऱ्याची स्वतंत्र नोंद तयार करण्यात आली.
एकाच व्यक्तीची पुन्हा मोजणी नाही या AI प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग. एखादा वारकरी शहरात प्रवेश करून पुढे दुसऱ्या मार्गाने गेला किंवा परत आला तरी विविध CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून त्याची पुन्हा मोजणी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. तसेच एखादी व्यक्ती शहराबाहेर जाऊन पुन्हा पंढरपुरात दाखल झाल्यास AI प्रणाली जुन्या ओळखीची शहानिशा करून नवीन व्यक्तीचीच नवीन नोंद करते.
नागरिकांच्या गोपनीयतेचीही काळजी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्दीची मोजणी करताना नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भारताच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आणि GDPR नियमांनुसार,कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती संग्रहित करण्यात आलेली नाही.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, आषाढी वारी ही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि योग्य नियोजनासाठी अचूक गर्दीचा अंदाज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पारंपरिक पद्धतीतील त्रुटी दूर करून यंदा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुमारे ३२ लाख वारकऱ्यांची अचूक नोंद करण्यात आली. भविष्यातील गर्दी व्यवस्थापन,वाहतूक नियोजन,आपत्कालीन व्यवस्थापन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या व्यवस्थापनात AI तंत्रज्ञानाचा हा प्रयोग महाराष्ट्रातील गर्दी व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा आणि आधुनिक टप्पा ठरणार आहे.
