सोलापूर : सोलापूर शहरात मध्यंतरी घडलेल्या कथित प्लाझ्मा तस्करी प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA) महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे व्हिसल ब्लोअर कार्यकर्त्यांकडून लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील काही खासगी रक्तपेढ्या व संबंधित संस्थांकडून प्लाझ्मा संकलन,साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येणार आहे. या संदर्भातील कागदपत्रे,पुरावे आणि आवश्यक माहिती संकलित करून आयुक्तांकडे सविस्तर तक्रार सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्लाझ्मा संकलन व वाहतुकीसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे.
मानवी जीवनाशी थेट संबंधित असलेल्या रक्त व प्लाझ्मा व्यवस्थापन प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून संबंधित यंत्रणांनी योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशीचे पुढील पाऊल काय असणार,याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
