नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते
जिल्हा प्रशासनातील शेकडो अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके केली
सोलापूर : १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिके केली. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे,असा संदेश यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी योग प्रात्यक्षिके करून दिला.
१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज २१ जून २०२६ रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय,जिल्हा प्रशासन,मेरा युवा भारत आणि जिल्हा योग्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन तहसीलदार पूनम दंडेले यांच्या हस्ते करून योग दिनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील विविध योग संस्था,पतंजली योगपीठ, भारतीय योग संस्था,विवेकानंद केंद्र,योग सेवा मंडळ,योग साधना मंडळ,योग प्रभा मंडळ,गीता परिवार सर्व कल्याण योग,सर्वोदय योग साधना मंडळ,योग असोसिएशन सोलापूर, भारत स्वाभिमान ट्रस्ट आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिक, विद्यार्थी,अधिकारी आणि योगप्रेमींसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने उपस्थित योग संस्थांनी शंखवादन व योग प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम योगगुरू म्हणून लता रेवनसिद्ध, माळगे,मधुकर सुतार,मिलिंद वाईकर,भगवान बनसोडे आणि विशाखा यांना योगगुरू ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
योग सेवा मंडळाच्या प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते,आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे,असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमात विविध योगासनांचे महत्त्व,निरोगी जीवनशैली आणि योगामुळे होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून “योग करा, निरोगी रहा” हा संदेश दिला.
कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे,शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कादर शेख,
तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शंकर कांबळे,तहसीलदार पूनम दंडेले, योगगुरू मनमोहन भुतडा,शाळा समिती अध्यक्ष एच.डी. मंकणी,क्रीडा अधिकारी मनपा नादिर शेख,तसेच विविध योग मंडळांचे प्रशिक्षक रघुनाथ क्षीरसागर,विद्या होनमुरे,अशोक गरड व अधिकारी-कर्मचारी,योग शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते, स्काऊटचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
