सोलापूर : जागतिक योग दिनानिमित्त सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन,प्रीतम यावलकर,डॉ.अश्विनी पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यक्रमात योगाचार्य विश्वंभर घोलप आणि योगाचार्य बापूराव जगताप यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती,मानसिक स्वास्थ्य आणि कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
