सोलापूर : बार्शी तालुका वैराग येथील "झाडे लावा,झाडे जगवा" हा संदेश केवळ घोषणांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत शेळगाव (आर) येथील 'एकता महिला मंच' ने पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. मंचाचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून गेल्या चार ते पाच वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या 'एक गाव,एक वडाचे झाड' या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शेळगाव (आर) येथील महिला सदस्यांना सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शेळगाव (आर) येथे झालेल्या विशेष सोहळ्यात महिला सदस्यांचा प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
रोपट्याचे झाले भव्य वडाच्या झाडात रूपांतर उपक्रमांतर्गत महिला सदस्यांना वडाचे रोप देण्यात आले होते. वर्षभर ऊन,वारा आणि पावसाची पर्वा न करता या रोपट्याचे जिवापाड संगोपन करण्यात आले. त्याचे आज भव्य वडाच्या झाडात रूपांतर झाले असून ते जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात डौलाने उभे आहे. या उत्कृष्ट संगोपनाची दखल घेत शेळगाव (आर) ला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा - कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोनाली गायकवाड यांच्या हस्ते 'एकता महिला मंच'च्या सदस्यांना प्रोत्साहनपर बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढविणे आणि इतरांना प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या महिलांचा झाला सन्मान - या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गीतांजली जोशी, आशा विभुते, सारिका जाधव, रूपा कचरे, रंजना गवळी, राजेश्री बादगुडे आणि सविता काटे यांचा समावेश होता. तसेच संगीता कदम, सुरेखा सपाटे आणि ताई देवकर यांनीही उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
सुंदर नियोजन - कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा विभुते यांनी केले. प्रास्ताविक रंजना गवळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गीतांजली जोशी यांनी मानले.
पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश - शेळगाव (आर) येथील महिलांनी एकत्रितपणे पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. "झाडे लावण्यापेक्षा ती जगविणे अधिक महत्त्वाचे" हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे. 'एकता महिला मंच'चा हा उपक्रम शेळगावच्या इतिहासात पर्यावरण संरक्षणाचा दिशादर्शक ठरत असून इतर गावांसाठीही आदर्श निर्माण करणारा आहे.
