ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात; माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क या दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. या कामासाठी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर रस्ता ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आला होता. मात्र ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे योग्य प्रकारे डांबरीकरण केले नव्हते. परिणामी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. उखडलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले, तसेच उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनास त्रास होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी सोलापूर महानगरपालिका तसेच नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी माजी नगरसेविका चव्हाण यांची भेट घेऊन समस्या मांडली.
यानंतर राजश्री चव्हाण यांनी २२ मे २०२६ रोजी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याच्या कामाची मागणी केली होती. या पाठपुराव्याची दखल घेत अखेर रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. "पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही नागरिकांच्या समस्या स्वतःच्या मानून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून राजश्री चव्हाण यांचे कार्य प्रेरणादायी आहे," अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
