सोलापूर : शहरातील हुतात्मा पुतळ्यालगत प्रस्तावित राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
रविवारी सायंकाळी जुळे सोलापुरातील सभागृहनेते नरेंद्र काळे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ पालकमंत्र्यांनी धावती भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना 'सुपुत्र संभाजी शंभूराजे' हे पुस्तक भेट देत सोलापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा अथवा स्मारक नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेच्या हुतात्मा पुतळ्यालगत जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनिधींनी जिजाऊ स्मारकाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि प्रेरणादायी महत्त्व अधोरेखित करत,भावी पिढीला राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे सांगितले.
पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारत मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील,असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे,सभागृहनेते नरेंद्र काळे,शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद डोंगरे, शहर उपाध्यक्ष सनी पाटू, अरविंद शेळके, रमेश भंडारे, सतीश माडकर, अमर दामा, शंकर पडसगीकर, सचिन गोडसे, शिवा वाघमारे, रमेश तरंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
