सोलापूर : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित केले जाते.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सोलापूर आणि मेरा युवा भारत (MY Bharat) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (नि.) यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकूण १४ जण उपस्थित होते. तसेच मेरा युवा भारत (एनवायके), सोलापूर येथील कार्यालयीन अधीक्षक सुभाष धावजी चव्हाण यांच्यासह कर्मचारीवृंद असे एकूण १० जण सहभागी झाले होते.
हेही वाचा - संस्मरण उद्यानातील वृक्षतोड प्रकरण गाजतेय; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
यावेळी उपस्थितांनी अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
