सोलापूर : प्रभाग क्र. २३ मधील सलगरवस्ती परिसरात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि हळहळ व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून सावली,स्वच्छ हवा आणि पर्यावरणीय संतुलन राखणाऱ्या वृक्षांच्या तोडीमुळे परिसराच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेवक राजशेखर पाटील, मंडल अध्यक्ष महेश देवकर तसेच इकोनेचरचे डॉ. मनोज देवकर यांनी वृक्षतोड झालेल्या ठिकाणी भेट देऊन तोडण्यात आलेल्या वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचेच नव्हे तर मानव जीवनाचेही अविभाज्य घटक असून त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
"झाडे वाचवा – पर्यावरण वाचवा" हा संदेश देत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
