सोलापूर : सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. मतमोजणीअंती त्यांना एकूण ४८३ प्रथम पसंतीची मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार देशमुख वसंतराव बोलेगराव यांना ११८ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार चार टेबलांवर झालेल्या मतमोजणीत राजेंद्र राऊत यांना अनुक्रमे ११५, ११५, ११९ आणि १३४ अशी मते मिळाली. दुसरीकडे देशमुख वसंतराव बोलेगराव यांना ३२, ३१, २९ आणि २६ अशी मते मिळाली.
मतदारसंघात एकूण ६१४ मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६०१ मते वैध ठरली असून १३ मते अवैध ठरली. वैध मतांपैकी राजेंद्र राऊत यांनी तब्बल ३६५ मतांच्या फरकाने विजय मिळविला.
निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी राजेंद्र राऊत यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
मतमोजणीचा तपशील
राजेंद्र विठ्ठल राऊत -४८३ मते
देशमुख वसंतराव बोलेगराव - ११८ मते
एकूण वैध मते - ६०१
एकूण अवैध मते - १३
एकूण मतदान - ६१४
विजयाचा फरक - ३६५ मते
सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राजेंद्र राऊत यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
