पुणे : महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ रोजी लागू केलेल्या माहितीचा अधिकार (RTI) नियम २०२६ विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून,नियमांतील त्रुटी दूर न केल्यास ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
माहितीचा अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशाला बाधा आणणाऱ्या आणि नागरिकांच्या माहिती मिळविण्याच्या अधिकारावर मर्यादा घालणाऱ्या अनेक तरतुदी नव्या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथील ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाच्या शिष्टमंडळाने १७ जून रोजी अण्णा हजारे यांची भेट घेऊन शासनाच्या राजपत्रातील नियमांची माहिती दिली.
शिष्टमंडळाने नियमांमधील विविध त्रुटी तसेच माहिती अधिकार कायद्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांविषयी सविस्तर निवेदन अण्णा हजारे यांच्याकडे सादर केले. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे म्हणाले की, “माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही तरतुदी स्वीकारल्या जाणार नाहीत. माहितीचा अधिकार कायद्याची मूळ भावना जपली गेली पाहिजे.”
नियमांमधील आक्षेपार्ह बाबी दूर करण्यात शासनाने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर ५ जुलै २०२६ पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिर परिसरात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत शासनाने नागरिकहित लक्षात घेऊन माहितीचा अधिकार कायद्याची मूलभूत भावना अबाधित ठेवावी,अशी मागणी केली आहे. RTI कायदा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासनाला चालना देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
