कोणत्याही आस्थापनाने बालकामगार ठेवू नयेत,अन्यथा कारवाई
दि 12 जून जागतिक बालकामगार दिनानिमित्त कारखान्यांना भेटी
सोलापूर : दिनांक 12 जून या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सोलापूर मार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिल्ह्यात दिनांक 12 जून 2026 रोजी कारखान्यांना भेटी देणे,बालकामगार प्रथा विरोधीसह्यांची मोहीम राबविणे, पोस्टर चिकटविणे आणि जनजागृती करणे यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळून आल्यास त्यांची मुक्तता करणे आणि बालकामगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे,तसेच मालक/चालक यांचेकडून आस्थापनांमध्ये 14 वर्षाखालील बालकामगार काम करीत नाहीत आणि भविष्यातही काम करणार नाहीत असे हमीपत्र संबंधितांकडून घेण्यात येणार आहे.
कोणत्याही कारखाना,आस्थापना,हॉटेल,गॅरेज तसेच धोकादायक उद्योगामध्ये बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा असून अशा ठिकाणी बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
तरी कारखाना,आस्थापना,हॉटेल,गॅरेज तसेच इतर धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेवू नयेत, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
