सोलापूर : समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या व्वा महिला संघटनेने दिव्यांग बाबू बेरे यांना तीन चाकी सायकल भेट देत त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.
सोलापूर येथील कोनापुरे चाळ परिसरातील बाबू बेरे हे दिव्यांग असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. दैनंदिन कामांसाठी त्यांना घरोघरी उन्हातान्हात अनवाणी फिरावे लागत होते. त्यांच्या या हालअपेष्टा पाहून व्वा संघटनेच्या महिला प्रतिनिधी मार्था आसादे यांना त्यांची परिस्थिती अस्वस्थ करून गेली. त्यांनी संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्याकडे बाबू बेरे यांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडला.
यानंतर व्वा संघटनेच्या महिलांनी वर्गणी जमा करून बाबू बेरे यांना उपयुक्त ठरेल अशी तीन चाकी सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या या उपक्रमामुळे बाबू बेरे यांना दैनंदिन हालचाली करणे सोपे होणार असून त्यांच्या जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे.
या वेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की,आर्थिक परिस्थितीमुळे मदत करण्याची इच्छा असूनही ते बाबू बेरे यांना मदत करू शकत नव्हते. मात्र,व्वा संघटनेने पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले आहे. याबद्दल झोपडपट्टीतील महिलांनी संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले.
बाबू बेरे यांना बोलता येत नसल्यामुळे त्यांनी आपल्या आनंदाश्रूंमधूनच कृतज्ञता व्यक्त केली. सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
हेही वाचा - संस्मरण उद्यानातील वृक्षतोड प्रकरण गाजतेय; महापालिकेच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह
यावेळी व्वा संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे,शोभा गायकवाड,मार्था आसादे,पुष्पा हलकुडे,स्वाती मुकणार, वैशाली देशपांडे,स्वाती जाधव,शबाना मुलाणी,शीतल वाघमारे,नागम्मा बेरे,मोनिका बेलदोर,यल्लाम्मा म्हेत्रे आदी महिला उपस्थित होत्या.
समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत व्वा संघटनेने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
