सोलापूर : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत E-KYC व आयुष्मान कार्ड निर्मितीची विशेष मोहीम मागील ८ दिवसांपासून राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत योजनेचे काम अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. या मोहिमेमुळे सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात सलग आठ दिवस प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दिनांक 28/04/2026 ते 06/05/2026 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण १२,१६७ E-KYC कार्ड तयार करण्यात आले आहेत.
सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यमित्र, आशा सेविका व संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त E-KYC पूर्ण करून आयुष्मान कार्ड निर्मितीस अधिक गती द्यावी,असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनीही या मोहिमेला प्रतिसाद देऊन आपले आयुष्मान भारत कार्ड तात्काळ तयार करून घ्यावे,असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
