Ticker

6/recent/ticker-posts

२ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीला सोलापूर न्यायालयाकडून सशर्त जामीन

बनावट आयटी सर्टिफिकेट प्रकरणातील अटकेतील आरोपीला सशर्त जामीन मंजूर 

सोलापूर : सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल २ कोटी रुपयांच्या आर्थिक सायबर फसवणूक आणि बनावट आयटी सर्टिफिकेट प्रकरणातील अटकेतील आरोपीला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात आरोपी अशपाक हिफजुर्रहिमान अत्तार (वय ४६, रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर) याच्याविरुद्ध दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी गु.र. क्र. ०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६१, ६६, ६६(C), ६६(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.



फिर्यादीनुसार, आरोपी “ULTRA INFOTECH IT” नावाने कार्यालय चालवत होता. ऑनलाइन मुलाखती आणि परीक्षांमध्ये रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करून उमेदवारांच्या संगणकावर अनधिकृत प्रवेश घेतला जात होता. तृतीय व्यक्तीकडून परीक्षा देणे, विविध कंपन्यांची फसवणूक करणे तसेच नोकरीच्या आमिषाने उमेदवारांकडून पैसे उकळणे असे प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले. या संपूर्ण प्रकरणात सुमारे ३६६० जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, व्यवहारांची रक्कम सुमारे २ कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
सायबर पोलिसांनी १७ एप्रिल रोजी छापा टाकून संबंधित कार्यालय सील केले होते. या कारवाईत ८ सीपीयू, एसर, डेल, लेनोवो कंपनीचे ५ लॅपटॉप, विविध मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.



दरम्यान,आरोपीतर्फे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीचे वकील ॲड. कदीर औटी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, जामीन देण्यामागील मुख्य उद्देश हा आरोपीची खटल्यावेळी उपस्थिती सुनिश्चित करणे हा असून,योग्य हमी व जामीनदारांच्या माध्यमातून ती निश्चित करता येऊ शकते, असे सांगितले. तसेच अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नसून खटल्यास कालावधी लागणार असल्याने आरोपीला सतत कोठडीत ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. ए. मोर यांनी दिनांक २ मे २०२६ रोजी आरोपी अशपाक अत्तार यास सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी, ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.अभिषेक नागटिळक,ॲड.त्वरिता वाघ आणि ॲड.संकेत पवार यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड.कुलकर्णी यांनी बाजू मांडली.