सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंश संरक्षण, अवैध गोतस्करी प्रतिबंध आणि अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईसंदर्भात 21 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी,अशी मागणी शासन व मुंबई उच्च न्यायालय नियुक्त अॅनिमल वेल्फेअर ऑफिसर तसेच सामाजिक कार्यकर्ते केतन शहा यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे तसेच सोलापूर शहर व ग्रामीण प्रशासनातील संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात शहा यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि इतर संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. राज्यात वाढत्या गोतस्करी, अवैध गोवंश वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यावर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
निवेदनात अनधिकृत कत्तलखान्यांवर संयुक्त भरारी पथकांमार्फत नियमित कारवाई करण्याची, सीमावर्ती भागात तपासणी चौक्या कार्यान्वित करण्याची, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्याची तसेच डायल 112 हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय,शासनाने नियुक्त करण्याचे निर्देश दिलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे,तसेच गोवंश संरक्षणासाठी प्रशासनाने नियमित आढावा बैठका घेणे आवश्यक असल्याचेही शहा यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गोवंश संरक्षण ही केवळ धार्मिक बाब नसून सामाजिक आणि संवैधानिक जबाबदारी असल्याचे सांगत शासनाच्या परिपत्रकाची प्रभावी,पारदर्शक आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केतन शहा यांनी प्रशासनाला केले.
यावेळी जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजयभाऊ यादव,नगरसेवक तथा गोरक्षक सतीश शिरसिला, राधाकृष्ण गोशाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अभय कुलथे, ह.भ.प.आकाश शिरते महाराज,गोरक्षक पवन कोमठी, किशोर वैद्य,राजू भंडारी,किशोर तडका,रवी बुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
