सोलापूर : जुळे सोलापूर व प्रभाग क्रमांक 26 मधील उखडलेल्या रस्त्यांच्या समस्येबाबत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
प्रभाग 26 मध्ये लक्ष्मी कन्स्ट्रक्शनकडून ड्रेनेजची कामे करण्यात आली आहेत. मात्र या कामांसाठी खोदण्यात आलेले अनेक रस्ते अद्याप पूर्ववत करण्यात आलेले नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्वस्थितीत करून देणे आवश्यक असतानाही अनेक भागांमध्ये डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे.
ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क, कृष्णा कॉलनी, शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्त नगर (भाग 1 ते 5), हेरिटेज फ्रॉम, प्रियांका नगर, पंचवटी नगर, विश्व नगर तसेच रोहिणी नगर (भाग 1) या परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास जुळे सोलापूरमधील नागरिकांना सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल,असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत येत्या आठवडाभरात प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येईल,असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनीही प्रभागातील विविध नागरी समस्यांकडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचे लक्ष वेधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
