सोलापूर : कोठाळे (ता.मोहोळ) येथील शेतकरी सोमनाथ वसंत पवार यांच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बेकायदेशीर सावकारीचे आरोप असलेल्या चार आरोपींची सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सत्र खटला क्रमांक ८८/२०२४ मध्ये दिनांक १४ मे २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
या प्रकरणात आरोपी राजाराम गोरख सलगर (रा.कोठाळे, ता.मोहोळ), तुकाराम बापू तेरवे,लिंगदेव कृष्ण सलगर आणि काकासाहेब दशरथ सलगर (सर्व रा.पुळुजवाडी,ता.पंढरपूर, जि.सोलापूर) यांच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६६/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम ३९ व ४५ अंतर्गत २९ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र २ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
फिर्यादीनुसार,मयत सोमनाथ पवार यांनी आरोपींकडून व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जात होती. आरोपींकडून सातत्याने दमदाटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी २७ मे २०२३ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्षाकडून तक्रारदार,साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्यासह एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र,आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादात सरकारी पक्षाच्या पुराव्यांतील अनेक त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या.
बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मयताने आत्महत्या केल्याचा आरोप वैद्यकीय पुराव्यांशी सुसंगत नाही. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीनुसार तसेच रासायनिक विश्लेषण अहवालानुसार मृताच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य किंवा कथित ‘२,४-डी’ तणनाशक आढळून आलेले नव्हते. उलट डॉक्टरांनी दिलेल्या अंतिम अभिप्रायानुसार मृत्यूचे कारण ‘बायलेटरल लोबार न्यूमोनिया’ हा नैसर्गिक आजार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
याशिवाय,कथित आत्महत्येसाठी वापरलेली विषाची बाटली किंवा तत्सम कोणतीही वस्तू घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली नव्हती. घटनास्थळ पंचनामा तसेच तपासादरम्यान आत्महत्येच्या आरोपाला पुष्टी देणारा कोणताही भौतिक पुरावा समोर आला नसल्याचेही बचाव पक्षाने नमूद केले.
तसेच आरोपी बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत होते किंवा त्यांनी मयताचा आर्थिक छळ केला,हे सिद्ध करणारा कोणताही स्वतंत्र आणि विश्वासार्ह पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकला नसल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने मांडला. पोलिसांनी काही खरेदीखते अभिलेखावर आणली असली तरी त्या व्यवहारांचा सावकारीशी संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र साक्षीदाराची किंवा संबंधित अधिकाऱ्याची साक्ष तपासण्यात आलेली नव्हती. आरोपींनी मयतास धमक्या दिल्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त केले, याबाबतही कोणताही ठोस व निर्विवाद पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयासमोर अधोरेखित करण्यात आले.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद,साक्षीपुरावे आणि वैद्यकीय अहवालांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. परिणामी,चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड. वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड. मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड. संकेत पवार आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड.ए.जी.कुर्डुकर यांनी बाजू मांडली.
