पुणे : मुंबई सीएसएमटी ते सोलापूर धावणाऱ्या 22225 वंदे भारत एक्सप्रेसला 27 एप्रिल सोमवारी संध्याकाळी पुणे रेल्वे स्थानकात किरकोळ अपघात झाला. सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास यार्डजवळील डायमंड क्रॉसिंग परिसरात ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने,या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवाशांना दुखापत झाली नाही.
घटनेचा तपशील - रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 22225 CSMT-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्थानकात प्रवेश करत असताना चौथा कोच (C-15) पहिल्या रुळावरून उतरला. ही घटना डायमंड क्रॉसिंगजवळ घडल्यामुळे तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रवासी सुरक्षित - ट्रेनमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणतीही जखमी किंवा हानी झालेली नाही. प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली.
तपासाचे आदेश - या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड, ट्रॅकची स्थिती किंवा सिग्नलिंगमधील अडचणी यांचा सखोल तपास केला जाणार आहे.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम - घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
