Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात २४६ गावे टंचाई आराखड्यात; १७८ टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची योजना



सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सन २०२५-२६ साठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून त्यामध्ये २४६ गावे आणि ५९९ वाड्या-वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यासाठी अंदाजे १२०४.१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यापूर्वीच्या वर्षांचा आढावा घेतल्यास, सन २०२३-२४ मध्ये २१४ टँकरच्या माध्यमातून १८० गावे व १२७३ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर सन २०२४-२५ मध्ये ६९ टँकरद्वारे ५९ गावे आणि ५८७ वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यात आले होते.



चालू वर्ष २०२५-२६ साठी १७८ टँकरच्या माध्यमातून १४७ गावे आणि ५८९ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मार्च अखेरपर्यंत ४८ टँकर प्रस्तावित असतानाही एकाही टँकरची मागणी आली नव्हती. मात्र, ११ एप्रिल २०२६ पासून उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात एक टँकर सुरू करण्यात आला आहे.

तसेच,अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईकनगर, बार्शीतील भोयरे, तसेच माळशिरस तालुक्यातील पिंपरी व पळसमंडळ या ठिकाणी एकूण चार टँकर प्रस्तावित आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण ५१ टँकर फीडिंग पॉइंट निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये ११ सार्वजनिक आणि ४० खासगी पाणीस्रोतांचा समावेश आहे.



गेल्या वर्षीच्या (२०२४-२५) टंचाई कालावधीसाठी ८.१७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप हा निधी प्राप्त झालेला नाही.

याशिवाय, नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे व ३९ गावे,तसेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व ११ गावे या प्रादेशिक योजनांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून सध्या या कामांचा निविदा प्रक्रिया सुरू आहे.