सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची कुजबूज सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्ते सातत्याने पक्षासाठी काम करत आहेत. मात्र अलीकडच्या काळात इतर पक्षांतून येणाऱ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असून,काहींनी हाताची घडी घालून शांत बसण्याचा मार्ग स्वीकारल्याचेही बोलले जात आहे. पक्षाविरोधात उघडपणे बोलण्यास कार्यकर्ते टाळाटाळ करत असले,तरी अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवार,दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सोलापुरात येत असून,हरीभाई देवकरण प्रशाला येथे जनतेचे आभार मानण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकडे कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या पक्षांतून आलेल्या आमदारांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गट-तटाच्या राजकारणामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, आणि नाराज कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
