Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आरोपीस सशर्त जामीन


सोलापूर : मंगळवेढा येथील धनश्री जगताप यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीस पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०१४६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८, ३५२ व ३(५) अंतर्गत संदीप गौतम जगताप (वय ३६, रा. सप्तशृंगी नगर, मंगळवेढा) यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध ७ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.



फिर्यादी आप्पासो मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी धनश्री हिचे लग्न १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संदीप जगताप यांच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून तिच्या मानसिक आरोग्याबाबत आक्षेप घेण्यात येत होते. त्यानंतर तिला माहेरी पाठविण्यात आले होते व तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांकडून धनश्री यांच्यावर तिच्या आजाराबाबत दबाव टाकण्यात येत होता. दरम्यान, ४ मार्च २०२६ रोजी सासरील शेतात तिचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संदीप जगताप यांना अटक केली होती.



दरम्यान, आरोपीने पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, FIR मध्ये सुरुवातीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून खुनाचा स्पष्ट आरोप नाही. तसेच, खुनासंदर्भात ठोस प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. कॉल रेकॉर्डिंगमुळे केवळ उपस्थिती दर्शविली जाते, मात्र त्यावरून गुन्हा सिद्ध होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच,मृत धनश्री या मानसिक आजारावर उपचार घेत होत्या व त्यांच्यावर न्युरोलॉजिस्टकडून उपचार सुरू होते. आरोपी ७ मार्चपासून कोठडीत असून तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याचा युक्तिवादही करण्यात आला. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्यास न्यायालय योग्य अटी लावू शकते, असेही सांगण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड.वैभव बोंगे,ॲड.संकेत पवार,ॲड.साहिल शेख,ॲड.त्वरिता वाघ, ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे व ॲड.रोहित थोरात यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. वांगीकर यांनी बाजू मांडली.