Ticker

6/recent/ticker-posts

विधान परिषदेच्या राजकारणात ‘भगवंता प्रकट दिन’ची एंट्री; माजी आमदार राजेंद्र राऊत चर्चेत


सोलापूर :  बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, विधान परिषदेवर जाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अलीकडील उपक्रमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः ‘भगवंता प्रकट दिन’ साजरा करण्याच्या निर्णयामुळे शहरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की,मागील अनेक वर्षांपासून आमदारकीचा कार्यकाळ पार पाडतानाही राऊत यांनी यापूर्वी कधीही या प्रकारे ‘भगवंता प्रकट दिन’ साजरा केला नव्हता. त्यामुळे यामागील नेमका हेतू काय, याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल व्यक्त केले जात आहे. काहींच्या मते, आगामी विधान परिषद निवडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असू शकतो.



याचबरोबर,उच्च न्यायालयाचे आदेश अस्तित्वात असताना शासकीय जाहिरातींमध्ये पक्षीय प्रचाराचा वापर केल्याच्या आरोपांमुळेही वातावरण तापले आहे. या प्रकरणीही राऊत यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून,यामागे वरिष्ठ नेतृत्वाला खुश करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.



दरम्यान,काही माध्यम प्रतिनिधींमार्फत ‘पेड न्यूज’च्या माध्यमातून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे बार्शीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.


आता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, तसेच पक्ष नेतृत्व यावर काय निर्णय घेते,याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.