सोलापूर : बार्शी नगरपालिकेच्या जाहिरातीवरून नव्या वादाला तोंड फुटले असून सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये बार्शी नगरपालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समिती या सरकारी संस्थांचा उल्लेख राजकीय पक्षासोबत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या जाहिरातीवर टीका करताना,सरकारी संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी होत असल्याचे म्हटले आहे. करदात्यांच्या पैशातून चालणाऱ्या संस्थांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिमेशी जोडणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात त्यांनी मनीष देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. यामध्ये बार्शी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) तसेच बाजार समितीचे सचिव यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान,या प्रकरणावर अद्याप संबंधित प्रशासन किंवा राजकीय पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जाहिरातीच्या आशयाबाबत कायदेशीर कारवाई होणार का,याकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.
