सोलापूर : विजापूर रोडवरील मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात महात्मा बसवेश्वरांची ‘बसवसृष्टी’ उभारावी,अशी मागणी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी प्राचार्य मनोज बिडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महामंडळाचे ट्रस्टी रमेश हसापुरे,सकलेश बाबुळगावकर, बसवराज दिंडोरे,नामदेव फुलारी,चनबसप्पा गुरुभट्टी आदी उपस्थित होते.
प्रस्तावित बसवसृष्टीमध्ये भव्य अश्वारूढ पुतळा,कायक व शरणांच्या विचारांची माहिती देणारे दालन तसेच विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज असे मोठे सभागृह उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर सुमारे 28 एकर असून येथे सध्या 27 विविध व्यवसायांचे प्रशिक्षण कोर्स चालतात.
दरम्यान,या मागणीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,मंत्री मंगल प्रभात लोढा,पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनाही ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले असल्याची माहिती हत्तुरे यांनी दिली.
