सोलापूर : धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या वतीने सभासद झालेल्या ऑटोरिक्षा चालकांना ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सोलापूर येथे उत्साहात पार पडला. प्रादेशिक परिवहन अधिकारी,सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात एकूण १९९ ऑटोरिक्षा चालकांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित चालकांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये विशेषतः ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी योजना, कर्तव्यावर असताना जीवन व अपंगत्व विमा योजना, आरोग्य लाभ योजना, कामगार कौशल्य विकास योजना, अपघात झाल्यास अर्थसाहाय्य योजना तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे ऑटोरिक्षा चालकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता मिळणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील विविध ऑटोरिक्षा संघटनांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सभासद नोंदणी शुल्क भरून अधिकृत संकेतस्थळ https://ananddighekalyankarimandal.org द्वारे आपली नोंदणी करावी.
