बार्शीतील मंडळ अधिकाऱ्याला ३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
सोलापूर : बार्शी तालुक्यातील उपळे (दुमाला) मंडळातील मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) यांना ३,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबी सोलापूर युनिटने यशस्वीपणे पार पाडली.
तक्रारदाराने त्यांच्या आजीच्या नावावर शेतजमिनीचा ७/१२ उतारा वारस म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. या नोंदीस प्रमाणित करण्यासाठी तसेच ७/१२ उताऱ्यावरील ‘लॉक’ काढण्यासाठी (अनलॉक) मंडळ अधिकारी फुलारी यांनी तक्रारदाराकडे ३,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
एसीबीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष फुलारी यांनी ३,००० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी वैराग पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते करीत आहेत. कारवाईत पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, सलीम मुल्ला तसेच कर्मचारी अक्षय श्रीराम यांनी सहभाग घेतला.
दरम्यान,कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबी सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
