मुंबई : मौजे करजगी,ता.अक्कलकोट,जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद मालकीच्या विविध शासकीय जागांचा ग्रामीण रुग्णालयासाठी वापर करण्याच्या प्रस्तावावर आज दिनांक २९ एप्रिल बुधवार रोजी मंत्रालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली.
करजगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,जनावरांचा दवाखाना तसेच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेची जागा ग्रामीण रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला होता. या प्रस्तावाच्या सर्व बाबींचा सखोल विचार करून संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान करजगी,ता.अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयासाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम,सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
स्थानिक पातळीवरील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून, यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही वेगाने राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या उपक्रमामुळे करजगी व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी होणारी गैरसोय कमी होऊन ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
