सोलापूर : NTPC Limited अंतर्गत येणाऱ्या एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील युवकांसाठी आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. २६ मार्च २०२६ रोजी अहेरवाडी,फतातेवाडी,होटगी स्टेशन आणि तिल्लेहल या गावांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ग्रामीण युवकांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्यांच्या अंगी खेळभावना विकसित करणे तसेच परस्पर सहकार्य,समन्वय आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी.जे.सी.शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी खेळांचे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “क्रीडा स्पर्धांमुळे केवळ शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही,तर समाजात एकता आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ होते.”
कार्यक्रमाला मुख्य महाव्यवस्थापक (संचालन व देखभाल) एम.के.बेबी,महाव्यवस्थापक (देखभाल व अतिरिक्त प्रशासन) सुभाषिस बंदोपाध्याय यांच्यासह एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी तसेच विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागाशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना उत्साह, ऊर्जा आणि खिलाडूवृत्ती दाखवली. अंतिम सामन्यात १२ षटकांच्या लढतीत फतातेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत १०५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात अहेरवाडी संघाने दमदार खेळ करत १०६ धावांचे लक्ष्य गाठले आणि स्पर्धेवर कब्जा केला.
समारोप समारंभात विजेत्या अहेरवाडी संघाचा तसेच उपविजेत्या फतातेवाडी संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच आणि ग्रामप्रतिनिधींनी एनटीपीसी सोलापूरच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
एनटीपीसी सोलापूरकडून अशा सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असून, यामुळे प्रादेशिक विकासासोबतच ग्रामीण समुदाय सक्षमीकरणाची दिशा अधिक बळकट होत असल्याचे दिसून येत आहे.
