सोलापूर : दत्त प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक मंगेश मधुकर मोरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात तसेच बार्शी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ.मोरे यांनी “प्राथमिक स्तरावरील मूल्यमापनातील नवप्रवाहाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञान सहाय्यित कार्यक्रमाचे विकसन” या विषयावर संशोधन पूर्ण केले. आजच्या डिजिटल युगात प्राथमिक शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अधिक प्रभावी,अचूक आणि पारदर्शक पद्धतीने कसे करता येईल,यावर त्यांनी आपल्या प्रबंधातून सखोल विवेचन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
हे संशोधन कार्य त्यांनी कॉलेज ऑफ एज्युकेशन,बार्शी या संशोधन केंद्रातून पूर्ण केले. प्रा.डॉ.एम.एस.डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अभ्यास केला. दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठात त्यांच्या प्रबंधाचा ‘ओपन डिफेन्स वायवा’ पार पडला. या वेळी बाह्य परीक्षक म्हणून प्रा.डॉ.संतोष खिराडे उपस्थित होते,तर कमिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.आर.एस.हिरेमठ यांनी पदवी जाहीर केली.
या यशामागे छत्रपती शिक्षण संस्था व संबंधित संस्थांचे संस्थापक-अध्यक्ष मोहन ठोंगे,सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संभाजी अण्णा जगदाळे,तसेच कॉलेज ऑफ एज्युकेशन,बार्शीचे प्राचार्य डॉ.व्ही.पी.शिखरे यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स,अंधेरी (मुंबई) चे प्राचार्य डॉ.दिपक ननावरे आणि इतर प्राध्यापकांचेही सहकार्य मिळाले.
पीएच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.मंगेश मोरे यांचा मित्रपरिवार तसेच सहकारी शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,शिक्षण क्षेत्रासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरत आहे.
