सोलापूर : एनटीपीसी सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आर्थिक वर्ष २०२५-२६ मार्चअखेर ६,६०० एमयू वीज उत्पादनाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ५,९७१ एमयू वीज निर्मिती करण्यात यश मिळाले आहे. या उत्पादनामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश,छत्तीसगड,गुजरात,गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांचा वीजपुरवठा अधिक सक्षम झाला असल्याची माहिती एनटीपीसीचे परियोजना प्रमुख बी.जे.सी.शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फटातेवाडी आणि अहेरवाडी येथे उभारलेले २x६६० मेगावॅट (१३२० मेगावॅट) क्षमतेचे हे केंद्र पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कार्यरत आहे. फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन (एफजीडी) प्रणालीद्वारे फ्ल्यू गॅसमधील सल्फर डायऑक्साइड ९७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत आहे. याशिवाय २३ मेगावॅट सौर प्रकल्प,बायोमासचा वापर, झिरो लिक्विड डिस्चार्ज आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाला चालना दिली जात आहे.
या केंद्रात सुरक्षिततेसाठी ISO 45001:2018 मानांकन असून सर्व कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना नियमित प्रशिक्षण व प्रात्यक्षिके दिली जातात. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रकल्पाला ‘गोल्डन पीकॉक एचआर एक्सलन्स’, ‘राष्ट्रीय कचरा व्यवस्थापन’, ‘सुरक्षा नवोन्मेष’ यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
प्रकल्प सामाजिक बांधिलकीतही आघाडीवर असून परिसरातील गावांमध्ये रस्ते,पाणीपुरवठा,शाळा,सामुदायिक केंद्रे,महिला सक्षमीकरण,कौशल्य विकास,आरोग्य शिबिरे, पूरग्रस्त मदत आणि पोषण जनजागृतीसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. ऊर्जा निर्मितीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखत एनटीपीसी सोलापूर प्रकल्प देशासाठी आदर्श ठरत असून भविष्यातही शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू राहील,असे शास्त्री यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेस मुख्य महाप्रबंधक (प्रचालन व अनुरक्षण) एम.के.बेबी,महाप्रबंधक (अनुरक्षण व राख तलाव प्रबंधक) सुभाषीस बंद्योपाध्याय तसेच अपर महाप्रबंधक (मानव संसाधन) कन्हैया दास उपस्थित होते.
