सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय ३०) यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी (दि.२८ मार्च २०२६) उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी सुदर्शन जाधव हे वाफळे (ता.मोहोळ,जि.सोलापूर) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. दि.२७ मार्च रोजी तक्रारदार राजकिरण सावंत व इतर दोन ट्रॅक्टर मालक मुरूम वाहतूक करत असताना त्यांचे ट्रॅक्टर वाफळे गावात पकडण्यात आले होते. संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आणि सोडून देण्यासाठी आरोपी तलाठ्याने तिघांकडून प्रत्येकी ३३ हजार रुपये,अशी एकूण ९९ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी इतर दोन ट्रॅक्टर मालकांनी प्रत्येकी ३३ हजार रुपये देऊन एकूण ६६ हजार रुपये दिले होते. तक्रारदारांकडे त्या वेळी २३ हजार रुपये असल्याने त्यांनी ती रक्कम दिली होती. उर्वरित १० हजार रुपये दि.२८ मार्च रोजी देण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान, तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ACB पथकाने पंचासमक्ष पडताळणी करून सापळा रचला. शनिवारी तक्रारदाराकडून उर्वरित १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी माढा पोलीस ठाणे (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून,पुढील तपास ACB कडून सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
