गर्भाशयाच्या मूखाच कर्करोग रोखण्यासाठी काय करावं...?
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर सांगितलं
सोलापूर : गर्भाशयाच्या मूखाच कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळीच लसीकरण केल्यास हा भयंकर आजार रोखण्यासाठी मदत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सविस्तर माहिती दिली. सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून यावर मोफत लसीकरणाव्हे आयोजन करण्यात आले आहे. एचपीव्ही लसीचे डोस घेतल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका ८५ ते ९० टक्के कमी होतो. १४ वर्षाखालील मुलींना मोफत ह्युमन पॅपिलोमाव्हायरस ही लस देण्यास सुरूवात झाली आहे. हे लसीकरण भविष्यातील आरोग्यासाठी एक सुरक्षा कवच असणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.
मागील काही वर्षापासून महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. गर्भाशयाच्या मुखाला कर्करोग सारखे भयंकर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कर्करोगाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी १४ वर्षे वयोगटातील मुलींना ह्युमन पेंपिलोमाव्हायरस ही लस मोफत दिली जात आहे. एचपीव्ही लसीकरण हे १४ वर्षे वयोगटातील (ज्यांनी १४ वर्षे पूर्ण केलेली आहेत,१५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत) त्या मुलींना देण्यात येत आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील ९० दिवसाच्या कालावधीत १५ वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या तीन महिन्याच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत लसीकरणास पात्र राहणार आहे.
कधी व कुठे मिळणार लस? - शाळांच्या माध्यमातून विद्यार्थिनीची नोंदणी केली जात आहे. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मिळणार आहे. शिवाय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ही लस उपलब्ध असणार आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना जारी केल्या आहेत.
महागडी लस शासनाकडून मोफत - बाजारात गार्डासिल-४ या लसीची किंमत सुमारे ३ हजार ९२७ रुपये एवढी आहे. सरकार ही लस मोफत देणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरणास प्रतिसाद द्यावा व भविष्यातील गंभीर आजारांपासून सुरक्षित रहावे. सध्या काही समाजमाध्यमांवर या लसीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. ही लस मुलींना भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आवाहन केले - सर्व पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे आणि या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मोहिमेला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
