Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात लोकप्रतिनिधी व महापुरुषांचे फोटो लावून अतिक्रमण; महापालिका कारवाई करणार का? नागरिकांचा सवाल


सोलापूर : शहरात विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी,राजकीय नेते तसेच महापुरुषांचे फोटो लावून रस्ते,पदपथ आणि मोकळ्या जागांवर अतिक्रमण केल्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असून, यावर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्न आता सोलापूरकर उपस्थित करू लागले आहेत.


शहरातील मुख्य रस्ते,चौक,पदपथ तसेच सार्वजनिक जागांवर मोठमोठे बॅनर,कमानी,कटआउट आणि शेड उभारून काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा महापुरुषांचे फोटो लावले जात असल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हे अतिक्रमण अनेक महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढत असल्याचीही तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की,महापुरुषांविषयी सर्वांनाच आदर आहे. मात्र त्यांच्या नावाखाली सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणे योग्य नाही. नियम सर्वांसाठी समान असावेत आणि अतिक्रमण कोणीही केले तरी त्यावर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान,शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत सोलापूर महापालिका वेळोवेळी मोहीम राबविते. मात्र लोकप्रतिनिधी किंवा महापुरुषांचे फोटो असलेल्या ठिकाणी कारवाई होते का,याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व अनधिकृत बॅनर,कमानी आणि अतिक्रमणावर एकसमान कारवाई करावी,अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे. आता प्रशासन या प्रश्नाकडे कसे पाहते आणि प्रत्यक्षात कारवाई करते का,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.